कविता - 🌷 " तृप्त-मस्त-मौला "

कविता - 🌷 " तृप्त-मस्त-मौला "  
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले               
तारिख - रविवार, १६ जून २०२४
वेळ - रात्री, १० वाजून २६ मि.

जमखंडीच्या जवळच एक कुल्हळी नामक गाव आहे 
आपटे-घराणे-पूर्वजांना शौर्यासाठी इनाम मिळाले होते 

गावात खास मातब्बर कुटुंबांत आपटे घराण्याची प्रतिष्ठा
मोठा चौसोपी चिरेबंदी वाडा व स्थावर-जंगम-मालमत्ता

आपटे कुटुंब श्रीमंत, गावातील शेत-जमिनी मालकीच्या 
माझ्या वडिलांना चार भाऊ आणि तीन बहिणीही होत्या 

एकत्र-कुटुंबपद्धती-मोठ्याकाकांची मुलं"काका"म्हणंत
त्यामुळे वडीलांना आम्ही सगळे पण 'काका' म्हणायचो

त्यांचा नितळ गौर वर्ण-मध्यम बांधा-उंची,निकोप प्रकृती
स्थितीप्रिय,भोळा स्वभाव,पण सावकारी अंगात मुरलेली

काकांच्या नोकरी-निमित्ताने आम्ही मिरजेत राहू लागलो
मोठ्ठं घर, माडी, समोर बाग,पाठीमागे अंगण-मजेत होतो

आमची आई शिस्तप्रिय पण आमचे काका अत्यंत प्रेमळ
आईकडे डाळ शिजली नाही की काकांना घालायचो गळ

सगळे लाड पुरवायचे पण आईच्या शब्दाचा मान ठेवूनच 
त्यांचं स्वतःचं असं एक विश्व होतं, त्यातच ते रमत असत

मुंबईत येऊन आई-काका दोघांनी सगळं सांभाळून घेतलं 
लहान-जागा-अडचणींचा-उच्चार न करता, समजून घेतलं

पहाटे उठून दूध-वाण-सामान आणायचे, लोणी काढायचे
फावल्या वेळात ट्रांझिस्टर कानाला लावून ऐकत बसायचे

कुणाच्या अध्यात-मध्यात नसून त्यांच्याच नादात असायचे
मोजकेच त्यांचे मित्र-सोसायटीत तेच सर्वांचे-आजोबा होते

आहे या परिस्थितीत बदल झालेला त्यांना रुचायचा नाही 
नाटक-सिनेमा, सहल-प्रवास-फिरणे यांची आवड नव्हती 

आमची आई जितकी रसिक, तितकेच काका तटस्थ होते 
देव-धर्म, कर्मकांड-अंधश्रद्धा-अंधविश्वास, नाही मानायचे 

आम्हाला कधीच रागावले नाहीत वा कधी मारलंही नाही 
मोडी लिपीत लिहू शकायचे, कानडी भाषा अवगत होती 

जगात काय चालले आहे याचं सोयरसुतक त्यांस नसायचे 
स्वभावतः मस्त-मौला होते, आहे त्यातच आनंदी असायचे

आम्हां सर्वांत आईची इच्छा-शक्ती व काकांची तृप्ती आहे 
म्हणूनच जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक वृत्तीही आहे 

पुरणपोळी खाताना,"प्रत्येक घासाला तोंड उघडते आहे" हे 
आमच्या काकांचे अत्यंत सुप्रसिध्द वाक्य नेहमीच आठवते

भगवद्गीतेत वर्णिलेल्या तटस्थपणाचे मूर्तीमंत उदाहरण होते 
आज ते नसले तरीही त्यांच्या सुखद स्मृतींनी, मन चिंब होते 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "