कविता - 🌷 " आप-पर-भाव " तारिख - २५ ऑगस्ट २०१६
कविता - 🌷 " आप-पर-भाव "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २५ ऑगस्ट २०१६
झुंझु-मुंझु झालं आणि,
गोड साद आली कानी,
धुंद-मधुर त्या स्वरांनी ...
काळजाचं झालं पाणी ...
माध्यान्हीच्या शांत वेळी,
द्वाड कान्हा, शीळ घाली ...
खट्याळ हरीच्या खोड्यांनी,
पुरती बावरली राधा-भोळी ...
तीन्ही सांज होऊ घातली,
गायी-वासरे घरा परतली ...
ऐकूनी कान्हाची मुरली,
सृष्टीही देहभान विसरली ...
रजनीचा प्रहर काळा,
सावळाच तो घन-निळा ...
राधेलाही विसर पडला ...
आप-पर-भाव मिटला ...
कोण ही राधा अन् कोण कन्हैया ...
कोण देवकी, कोण यशोदा मैय्या ...
कणा-कणात आहे, सुंदरसे स्वप्न
मना-मनात नांदे सदा राधा-कृष्ण ...
राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण...
राधा-कृष्ण गोपाल-कृष्ण...
युगानु-युगांपासून चालत आला हा खेळ ...
प्रत्येक स्त्री-पुरुष जणू राधा-कृष्ण-मेळ ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment