कविता- 🌷 ' पोच ' तारिख - सोमवार, ११ मार्च २०२४

कविता- 🌷 ' पोच '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - सोमवार, ११ मार्च २०२४
वेळ - संध्याकाळी, ५ वाजून ११ मि.

कित्येकदा अनवधानाने चुका होतात ...
कधी दुर्लक्ष केल्याने, बेफिकीर वृत्तीने
तर कधीकधी चिडून, लागट बोलण्याने
बोलणारा बोलतो पण वर्मी घाव होतात ...

मुळात आपल्या वागण्यावर, वाणीवर
ताबा सुटल्याने असे अपघात घडतात ...
हे जर दुसरा कोणी वागला असता तर ?
इतरांसाठी मात्र वेगळे नियम असतात ...

बालपणी लहान म्हणून, माफ करतात ...
किशोरावस्थेत'अर्धवट' म्हणून सोडतात ...
पण मोठेपणी सुध्दा जो वागेल बेदरकार,
त्या गोष्टीला मात्र माफी नाहीच सरकार !

थोडक्यात काय तर

विचार हवा, वागण्या-बोलण्या आधीच ...
हातून बाण सुटाण्याआधी सावरणं हवं !
फार सोपं असतं, मित्राला शत्रू बनवणं ...
पण शत्रू पुन्हा मित्र बनणं, कर्म-कठीण ...

दुसऱ्याकडून जी अपेक्षा वागण्याबद्दलची
तीच वागण्याची पद्धत अवलंबवायला हवी
मैत्रीतील जुजबी वाद, लगेच मिटायला हवे
किरकोळ बाबींचं स्तोम माजवता कामा नये

झालं गेलं पार विसरुन, आनंद द्यावा-घ्यावा ...
त्यासाठी " नीर-क्षीर-विवेक " मुळातच हवा ...
प्रत्येक क्षण-न्-क्षण भरभरुन जगायला हवा ...
जीवनात पूर्ण समतोल ठेवण्याचा, पोच हवा ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "