कविता - बालगीत - 🌷 ' खारूताई ' तारिख - गुरुवार, ८ फेब्रुवारी २०२४

कविता - बालगीत - 🌷 ' खारूताई '
कवयित्री -तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ८ फेब्रुवारी २०२४
वेळ - संध्याकाळी ६ वाजून ०९ मि.

खारूताई ओ खारूताई,
कशा आहात तुम्ही ?
झुपकेदार शेपटी घेऊन,
कुठे निघाल्या तुम्ही ?

सर-सर झाडावर चढता ...
तुरूतुरू लगबगीने जाता ...
घाबरुन सगळीकडे बघता ...
धारदार दातांनी कुरतडता ...

खारूताई ओ खारूताई,
काय काय खाता तुम्ही ?
दिवसभर चरत बसता,
सांगा, कसं पचवता तुम्ही ?

खारूताई ओ खारूताई,
काय तुमच्या पाठीवरती ?
डिझाईन हे चट्टेरी-पट्टेरी,
सांगा, काढले तरी कुणी ?

इवलुशा हाती दगड अन् माती,
उचलून खारूताई पुलावर टाकी
प्रत्यक्ष देवालाही मदत केली ...
'खारीचा वाटा'म्हणून नोंद झाली !

देवाने उचलून पाठ थोपटली ...
पाठीवर रामाची बोटं उमटली ...
तुमचे योगदान अजरामर झाले,
अन् पाठीवर मायेचे पट्टे उमटले ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















































































Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025