कविता : 🌷 ' खरं धन ' तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४
कविता : 🌷 ' खरं धन '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : शनिवार, २४ फेब्रुवारी २०२४
वेळ : ५ वाजून २२ मि.
मनुष्य-जीवन किती क्षुल्लक-क्षणभंगुर ...
एका बाजूला चालतं-बोलतं-सजीव तर,
दुसऱ्या क्षणी नडतो, मृत्युचा घाला-क्रूर ...
माहित नसतं काय घडणार, भविष्यात ?
काय काय वाढून ठेवले आहे, नशिबात ...
स्वतःच्या गुर्मीत बेधुंद जगतो वर्तमानात ...
जन्म झाल्यापासूनच दर क्षणा-क्षणाला ...
हसत-हसत जवळ घेत असतो मरणाला ...
अज्ञानामुळे उपभोगू शकतो, तो सुखाला ...
विश्वाच्या अवाढव्य पसार्यातील एक जीव ...
ज्याच्या अज्ञानावर, विधात्याला येते कींव ...
क्षणार्धात करु शकतो निर्जीवास, सजीव ...
सुखांध होत, गोळा करत सुटतो मालमत्ता ...
अखेरीस काय नेमकं न्हेणार, नसतो पत्ता ...
आजतागायत मृत्युवर नसे कोणाची सत्ता ...
जन्मा येता, मोजक्याच श्वासांची शिदोरी ...
बंद मुठीत घट्ट धरलेली, आयुष्याची दोरी ...
स्वेच्छेने रंगवण्यासाठी, जीवन-वही कोरी ...
धडधाकट शरीरयष्टी अन् संवेदनशील मन ...
ईश्वरीय वरद-हस्ताने लाभलेलं, हे खरं धन ...
सत्कर्म-सत्कार्य-परोपकारात रमावं तनमन ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment