कविता -🌷 " जन्म न देताही प्रति-आई ". तारिख - १२ ऑक्टोबर २०१६
कविता -🌷 " जन्म न देताही प्रति-आई "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १२ ऑक्टोबर २०१६
जन्मल्या जन्मल्या डोळे किलकिले
समोर खूप सारे उत्सुक डोळे दिसले
एकटक जणू मलाच पाहत होते सगळे
त्यां पलीकडे जाऊन, काहीच न दिसले ...
थकून मग मी डोळे मिटले-हे जग नेहमी पेक्षा होते वेगळे
पण मस्त वाटत होते निराळे-भूक लागता"अमृत-प्राशन"केले ...
तो आनंद मात्र होता अनोखा-पारावर नव्हता माझ्या सुखा
आईच्या उबदार कुशी-सारखा-तिच्या मखमली स्पर्शा- सारखा ...
आईच होती माझी संपूर्ण दुनिया-अगदी तिच्या सारखी ताईची माया
दोघींचा हात फिरता सुखावे काया-मी "ट्याहं" करताच ताईला येई दया ...
दर महीन्याला वाढदिवस -आई व ताईचा लागे कस
पद्धत होती एकदम राजस-लाडच व्हायचे रात्रं-दिवस ...
झोपताना अंगाई कानी पडायची-ती ऐकताना छान झोप लागायची
कधी माझ्या आधी ताईच पेंगायची-तिच्या मांडीवर गाढ झोप यायची ...
आई कामात मग मी ताईकडे-ताई मला नाचत फिरवी चहूकडे
तिच्या हाता रग लागे, फुटे रडे -दुसऱ्या कुणा दिले, की मी रडे ...
इतर कुणी मला, घेतलेलं नाही आवडायचं-त्यांचं धसमुसळं वागणं पसंत न पडायचं
त्यामुळं लगेच माझं " भोकांड " पसरायचंशेवटी ताईच्या कडेवर विराजमान व्हायचं ...
एके दिवशी खूप गडबड गोंधळ घरी-जसा असतो कोणत्याही लग्न- घरी
माझीच ताई निघाली होती सासरी-काही उमजेना, रडत का होती सारी ...
नंतर मला ताईच घरामधे दिसेना-मी काही केल्या बिल्कुल ऐकेना
आईच्या डोळ्यांचा पाझर थांबेना-मी कुणाच्या हातून खाईना-पीईना ...
जणू त्यावेळचा माझा " भूक-हडताल "-माझ्या मनाप्रमाणे व्हायचं एरव्ही सगळं
पण यावेळी काहीच तसलं नाही घडलं-मला ताप भरला अन् आईचं धाबं दणाणलं ...
का ते मला काही कळलं नाही-ताई आली,बसली,मला भेटली
पण राहिली नाही, ती परत गेली-अनेक दिवस हे कोडं सुटलं नाही ...
एखाद्या सणाला ताई घरी यायची-आकाश ठेंगणं होऊन,मी नाचायची
सर्व वेळ तिला पकडूनच ठेवायची-मला झोपवून ती नव्या घरी जायची ...
ताईच्या एका डोळ्यात हसू-अन् दुसऱ्या डोळ्यात आसु ...
अशी माझी सुंदर - प्रेमळ ताई-जणू जन्म न देताही प्रति-आई
हसली की दिसे जणू जाई-जुई-गोरींपान, नितळ सतेज - कांती
कोणतीही सुप्रसिद्ध नटीसुद्धा वाटे फिक्की ...
दोन्ही गालात मोहक खळी ...नाक जसे काही चाफेकळी ...
हास्य तिचे जणू कुंद-कळी ...आई मीठ-मोहऱ्या ओवाळी ...
कुणाची नजर न लागो अवेळी ...
लांब-सडक घनदाट केश-संभार-सावळ्या घनासमान, काळाभोर
रूपानं इतकी देखणी,न ठरे नजर-गरज नसे करायची कुंकू-पावडर ...
जणू विधात्यानं केली खास करामत-पाहुन तिला, दुखे अनेकांच्या पोटात
महाराणी भासे नुसत्या धूत-वस्त्रात-एकदम उठून दिसे ती हजार जणात ...
माणसं लहानपणी कशी निरागस असतात-मोठी झाल्यावर भावना का बोथट होतात
वयाबरोबर कोमल भाव का जरबट होतात-कदाचित यालाच "जीवन-जगणं"म्हणतात ...
पाठी वळून पाहता, आज प्रकर्षानं जाणवतंय
की काळाबरोबर आपलं काय काय वाहून जातं ...
भले त्याला अनुभव असं गोंडस नाव दिलं जातं
पण ज्याचं "जातं"त्यालाच खरं ते चांगलं कळतं ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷
Comments
Post a Comment