कविता - 🌷' खरं कसब '. दिनांक - २ जानेवारी २०२३

कविता - 🌷' खरं कसब '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
दिनांक - २ जानेवारी २०२३
वेळ - सकाळी ११ वाजून २६ मि.

बघता-बघता सरुन गेलं,
जुनं-पानं मावळतं वर्ष ...
नव आशा-आकांक्षांचं,
आलं-आलं हे नूतन वर्ष !

राग, रुसवे-फुगवे सारेच ...
गेले घाबरून दूर पळून,
नव्या उमेदीने क्षणन्-क्षण
जगूया आता भरभरून !

कडू-गोड, चुकलं-माकलं ...
सगळं-सगळं माफ करून,
नूतन वर्षाला सामोरे जावू,
झालं-गेलं सर्वच विसरून !

सरलेलं ते जुनं वर्ष होतं ...
जणू एक जुनंच पुस्तक,
पूर्ण वाचून मनन करून ... 
भलतंच गरगरलं मस्तक !

आता आयतं हातात पडलंय,
नवं करकरीत असं हे पुस्तक ...
३६५ पानांमधून सुवर्ण लुटून,
मग होऊ आपण नत-मस्तक !

" केल्याने होत आहे रे "
" आधी केलेची पाहिजे "
श्री समर्थांचे हे सार्थ-वचन, 
आचरणात आणले पाहिजे !

आयुष्य कितीही जरी मिळालं,
तरीही सदैव ते तुटपुंजं वाटतं ...
"उद्याला करु" असं म्हणंत-म्हणंत,
अवघं आयुष्य सरून जाऊ शकतं !

"कल करे सो आज कर", 
" आज करे सो अब ! "
जगूया अर्थपूर्ण-सुंदर-जीवन, 
त्यातच दडलं आहे खरं कसब !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "