कविता - 🌷 " ईश्वरीय वरद-हस्त "
कविता - 🌷 " ईश्वरीय वरद-हस्त "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख- २९ सप्टेंबर २०१६
गोड बातमीची हलकीशी चाहूल लागली ...
काश्मीरची हनिमून-ट्रीप चांगली फळली ...
परत येताना "ती"ची कळी होती खुलली ...
या बातमीने दोन्ही घरी आनंद-वर्षा झाली ...
सकाळी-सकाळी उठताच प्रसन्न बातमी ...
जणू आनंदोत्सवाची ही तर पक्की बेगमी ...
सगळं मनासारखं, तरी नको बिल्कुल गुर्मी ...
उलटपक्षी अजूनी जास्त, रत व्हावें सद्कर्मी ...
लाभल्या "ती"ला दोन-आई-एक स्वतःची जन्मदाती आई ...
ती म्हणजे तिची " ए-आई "अन दुसरी एक " अहो - आई" ...
त्या म्हणजे तिच्या सासुबाई ...
नात्यानं जरी असल्या तिच्या सासूबाई,
तितकाच आपलेपणा अन् काळजी घेई...
सासरी तिला कधीच "सासर" नाही वाटंलं ...
सर्वांकडून भरभरून प्रेम, वात्सल्याचा वर्षाव ...
त्यामुळं कधी भासली नाही माहेरच्यांची उणीव ...
"अहो-आईंनी" पण खूप केलं तिचं कोड-कौतुक ...
अप्पांनी तर नेहमीच तिला वागविलं लेकी-समान ...
दिसला तिच्या दिरात, तिला नसलेला भाऊ लहान ...
नणंद थोडी अबोल, पण मनानं सरळ, साधी छान ...
बाकी सारा गोतावळा जरी होता खूप मोठा ...
लाभला सदैव, त्या सर्वांच्या कौतुकाचा साठा ...
सगळं काही स्वप्नवत्, नव्हता आनंदाला तोटा ...
तिच्या पतिराजाचा, सर्व सुखात सिंहाचा वाटा ...
दुधात साखर पडावी अगदी तस्सेे झाले ...
यथावकाश दोघांचे चौकोनी कुटुंब झाले ...
दोन गोडसे छोकरे त्यांच्या घरट्याला लाभले ...
सदा त्यांनी घरादाराला भरभरून सुखंच दिले ...
"तो"व "ती" यांचा संसार छान होता चालला ...
जणू ईश्वराचा वरद-हस्त होता त्यांना लाभला ...
मनोमन प्रार्थना करीतसे "दृष्ट नको लागायला " ...
दोन्ही"आई"तत्पर"मीठ-मोहऱ्या"ओवाळायला ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Comments
Post a Comment