कविता - 🌷 " जाणीव " तारिख - २७ ऑक्टोबर २०१६
कविता - 🌷 " जाणीव "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २७ ऑक्टोबर २०१६
अगदी जन्मल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत ...
कशा-ना-कशा मागं माणूस सतत असतो धावत ...
म्हणतात ना, "सरड्याची धाव, फक्त कुंपणापर्यंत" ...
घबाड जरी मिळालं तरी, हावं नाही संपता संपत ...!
जणू जन्मतःच बाळकडू, सगळं गोळा करत जाणं ...
पोटातून बाहेर पडून, जगाचा विविध अनुभव घेणं ...
अंतर्गत मायाजालाचं ब्रह्मान्ड, बाह्य-जगताचं ऋण ...
तेथूनच सुरुवात होते, होणारे संस्कार गोळा करणं ...
घट्ट-बंद-मूठ एकदा उघडली की, ती उघडीच राहते ...
आयुष्यभर, पोतडीत जमा करणं ही चालूच राहते ...
वय वाढत जातं, माया मोह-जाळ्यात पार गुरफटते ...
ही"माया" मात्र आईच्या मायेहून फार वेगळी असते ...!
यथावकाश विद्यार्थी-दशेबरोबर सुरु होतं ज्ञानार्जन ...
मग पोटासाठी-नोकरी-धंद्यासाठी वण-वण करणं ...
नंतर परिस्थिती-निर्मित अपमान-टक्के-टोणपे खाणं
सरते शेवटी आपापल्या कुवतीनुरुप धनार्जन करणं ...
हे पै-पैसा कमावण्याचं दुष्ट-चक्र एकदा का सुरु झालं, ...
की नाही दुसरी-कसली भ्रांत, ना कशाचा कशाला मेळ ...
काळ्या पाण्याची सजा-जणू माणस होतो"कोलूचा बैल"...
दुसरं काहीही करण्यासाठी नसते इच्छा अन् नसतो वेळ ...
अगतिकपणे रेटतो धनार्जनाचा जीवघेणा एकतर्फी खेळ ...
कष्टानं कितीही"जमवली पूंजी"तरी ना मिळंत समाधान...
दिवस येतो-व-आला-तसा-जातो, संपत जातं जीवनमान...
अनंत कोटी गरजा आणि हाव यांतच अडकतात पंचप्राण...
साठी-सत्तरीत येई अंमळ शहाणपण पण उरत नसतं त्राण...!
हमखास विसरतो, आपण सगळे रिक्त हस्ते आलो आहोत...
जाताना सुध्दा, फक्त रिकाम्या हातानेच जाणार आहोत...
"हे माझं-ते माझं" म्हणून मिळेल ते सारं काही कवटाळतो...
त्यात काहीच"राम"नाही"हे अंतर्यामी पक्के जाणून असतो !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment