कविता - 🌷 " जन्माचं झालं सार्थक " तारिख - ३० सप्टेंबर २०१६

कविता - 🌷 " जन्माचं झालं सार्थक "        तारिख - ३० सप्टेंबर २०१६
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

जीवनात असं मागं वळून पाहता-मोहक क्षण, पुन्हा येती अनुभवता ...
तेव्हा कळत नाही त्यांची महानता-वेगळीच खुमारी त्या क्षणांची आता ...
पहीलं-वहीलं "ती"चं बाळंतपण ...म्हणजे पहील्यांदाचं आईपण होणं ...
ऐकायला, म्हणायला वाटतं छान ...प्रत्यक्ष अनुभवणं महा-कर्मकठीण ...
स्वतः मेल्याशिवाय जसा स्वर्ग नाही दिसंत ...तसंच "प्रसूती-वेदना" सोसल्या शिवाय,
त्या वेदना, कधीही पूर्णपणे नाही समजत ...बाळ-मुख-पाहून होणारं "अनोखं-सुख" केवळ शब्दातीत 

तिचे नऊ महिने पूर्ण झालेले, थोडे पोटात दुखायलाही लागलेले-दवाखान्यात, डॉक्टरीणबाईंनी तपासले ...
तिला तिच्या कळा जीवघेण्या वाटत होत्या-तिच्या दोन्ही "आई" उशाशी-पायाशी होत्या ...
तिच्या कळा अंतरा-अंतरानं चालूच होत्या-त्यांच्या गप्पा मात्र छान रंगात आल्या होत्या ...
माझ्या ह्याच्या वेळी, अमुक - अमुक ...माझ्या तिच्या वेळी, अमुक - तमुक ...
"अजून हिला काही म्हणाव्या तशा येतं नाहीत कळा"-या त्यांच्या बोलण्यानं तिचा संयम साफ सुटला-
कळांनी हैराण, तिला जीव नकोसा झालेला-तिला त्यांच्या "सहज-बोलण्याचा" फार राग आलेला 
अरे इथं तिचे प्राण कंठाशी, अन त्या म्हणताहेत, अजून फार काही चांगल्या कळा येत नाहीयेत ...
अहो, कळांमधे कसलं आलंय डोंबलाचं चांगलं-त्या जीवघेण्या म्हणून सरसकट "वाईट्ट" एकजात ...

डॉक्टरीणबाई आल्या तिचा आकांड-तांडव पाहून- जसं काही झालंच नाहीं अशा कॅज्युअली तपासून,
"हिच्या कळा एव्हाना वाढायला हव्यात दणकून "...तिला दरदरून घामच फुटला हे बोलणं ऐकून ...
तिची बहीण व भाऊ डॉक्टर ...त्यामुळं पक्कं ठरलेलं "नको-सीझर" ...
बजावून ठेवलेलं काही झालं तरी, हवी पूर्णतः " नैसर्गिक-पध्दतीची-प्रसूती "...
त्या क्षणी कळा देताना लाखवेळा, तिनं पूरतं मूर्खात काढलं होतं स्वतःला ...
स्वतःचा आगाऊपणा कसा नडला, याचा नव्यानं तिला साक्षात्कार झाला...

शेवटी एकदाच्या तीव्र-प्रसव-वेदना झाल्या सुरु, "एसी-रूम"मधे, डिसेंम्बरला नखशिखान्त घामेजून, 
शेवटचा उपाय म्हणून, ईश्वराचा धावा केला सुरु ... अंगात त्राण नसताना, उसना जोर काढून-काढून
बाळाचं डोकं "खाली ढकलताना", बाळंतपण म्हणजे जन्मच दुसरा ...ह्याचा चांगलाच प्रत्यय आला ...
जणू कल्पांतानंतर अगदी शेवटाला, बाळाच्या रडण्याचा "ट्याहं-ट्याहं" आवाज ऐकू आला ...
"अहो-आईंनी" बाळाला मध चाटला, त्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला ...
त्यांच्या अपार इच्छेनुसार नातू झाला ..."ए-आईनं" मात्र कुशीत घेतलं लेकीला ... 
"दोन जीवांतून" सुखरुप सुटली म्हणून देवाला, नमस्कार करुन साखरेचा नैवेद्य दाखवला ...

एकदाचं गंगेला घोडं न्हालं-कित्येक तासांपासून चाललेलं,"मोठ्ठया-कळांचं-नाट्य" संपलं-परमेश्वरानंच जणू बळ दिलं ...
नऊ महिने पूर्ण वेळ पोटात-दरेक क्षणी नवं-जीवाची साथ-त्याला प्रत्यक्षात पाहून-निरखून, तिच्या डोळ्यांचं पारंणं फिटलं !

इवले- इवलेसे हात-पाय-सुबक-सुंदर रंग-रूप ...त्या बाळ-कृष्णाला किती पाहू किती नको
काय करू अन काय नको ...असं त्या नव्यानं-बनलेल्या-आईला झालं ...
सुरेख-सुंदर मुखडा गोल ...त्यावर मखमली जावंळ ...
निळंसर डोळे पाही एकटक ...जणू विश्व-रूपच एकवटलं ...

गोड गुलाबी रंगाचं घालून टोपडं ...अति-मोहक असं ते बघून रुपंडं ...
तिच्या तृप्तीला आभाळही तोकंडं ...तिचं सफल-संपूर्ण झालं साकंडं ..
अन् तिच्या जन्माचं झालं सार्थक ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "