कविता - 🌷 " संस्कारांची महानता " तारिख - १६ डिसेंबर २०१६
कविता - 🌷 " संस्कारांची महानता "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १६ डिसेंबर २०१६
२०११ सालची गोष्ट ...आम्ही नीसहून स्वित्झर्लंडच्या" लुसन "ला आलो ...
झुरीकची सीमा ओलांडल्यावर हिरव्या-रंगाच्या एक-लाख छटा बघितल्या ...
डोळ्यांना अत्यंत सुखावह-नेत्र-दीपक, शितल मन-मोहक ...
लांब-रुंद पठारं, हिरवीगार ...त्यावर मनसोक्त चरणारी गाई-गुरं ...
पार्श्वभूमीवर निळं-निळं आकाश सुंदर ...प्रति-स्वर्गच जणू या पृथ्वी-तलावर ...
सर्वांग सृष्टी-सौंदर्याचं आकंठ रसपान-इतका नयनरम्य की वाटलं, संपूच नये हा प्रवास ...
" लूसन " हे स्वित्झर्लंडचं, अतिशय देखणं असं शहर ...
सगळी प्रेक्षणीय-स्थळं पालथी घातली-वस्तुतः प्रेक्षणीय होता प्रत्येक इंचनइंच ...
विधात्याची करणी, सर्वत्र उदंडं सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण ...
लुसनला मनसोक्त राहून, हिंडून-फिरून, लुटला आनंद ...
मग पुढचं शहर होतं " इंटर-लाकन "...त्यासाठी ट्रेनचं केलं होतं आरक्षण ...
हॉटेल चेक-आऊट करुन, गाठलं स्टेशन-तेव्हा माझी गट्टी एका फ्रेंच-बाईशी जमली ...
ती वयस्क होती-तिच्या ट्रेनला खूप अवधी होता, मोठ्या मुलासह सामान सांभाळत होती ...
ती तोडकं-मोडकं इंग्लिश आणि ९० टक्के फ्रेंच बोलणारी-मी ९५ टक्के इंग्लिश अन् जेमतेम ५ टक्के फ्रेंच !
तिच्या हावभाव व हातवाऱ्यांनी, मला समजायचं बहुधा माझ्या बाबतीतही तेच होत असावं ...
तिचा मुलगा मधेमधे "दुभाषा"ची भूमिका करायचा- एक आई, तिच्या दोन मोठ्या-मुलांसह,
स्वित्झर्लंड सारख्या अति-रम्य स्थळी येते, भारतापासून दूर, लॉंग-हॉलिडे-वेकेशन करते ...
हा"कॉन्सेप्ट"त्यांच्या साठी फार नवीन होता-म्हणून कदाचित, त्यांच्या पचनी पडत नव्हता ...
सर्व-साधारणतः पाश्चिमात्य देशात-आई-वडील व मुलं-मुली यांचे संबंधं,
फारच लांबलेले- ताणलेले असतात-ते फारच वरवरचे, औपचारिक असतात ...
किंबहुना जवळजवळ, अदृष्य असतात-त्या सर्वांचं कायम-स्वरूपाचं-ठाम मत हे असतं ...
की "वेळ मजेत" फक्त "त्यांच्या पार्टनर" बरोबरच शक्य, अन्य नातेसंबंध नगण्य-निव्वळ उपचार म्हणून ...
भारतीय संस्कृतीचं "सटल्-बॉण्डिंग" त्या लोकांना समजण्या-पलीकडचं ...
त्यामुळे एका "सिंगल-पेरेंट" बरोबर, इतकी मोठी, सुंदर, महागडी टूर करणं ...
याची ते साधी कल्पनाही करु शकत नव्हते ...!
त्यांच्या मते," थँक्स-गिविंग " किव्हा " ख्रिसमस " शिवाय,
आई-वडीलांशी भेट, बोलणं-सुसंवाद-साधी चौकशीही अशक्यप्राय ...!
पाश्चिमात्य मुलांच्या दुनियेत, त्यांच्या आयुष्यात, जन्म-दात्याना स्थानच नाही ...
त्यांच्या साठी वेळ सुद्धा नाही-त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं नाही ...
अथवा त्यांच्या साठी पै-पैसा खर्च करणंही नाही ...!
हे सांगताना, फ्रेंच-बाईच्या निळ्या-निळ्या डोळ्यांत,
पाणी दाटून आलेलं-मी पाहूनही-न-पाहिलंसं केलं ...
कदाचित् तिची अंतर्-व्यथा, तरळली पाण्याच्या रूपानं ...
"तू फार नशीबवान आहेस"...असं काहीसं तिनं म्हटलं ...
मग स्वतःला आवर घालून एक "फेक-स्माईल" तिनं दिलं ...
अंतर्-मनीचे-भाव लपवण्याचा, एक केविलवाणा प्रयत्न ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment