कविता 🌷 ' परमानंदात खरं जगणं ' तारिख - ४ डिसेंबर २०१६

कविता -🌷 " परमानंदात खरं-जगणं "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख -४ डिसेंबर २०१६

नेमेची येतो मग पावसाळा ...तसा, नेमेची येतो वाढ-दिवस ...
दर-वर्षी साजरा होतो वाढ-दिवस-अगदी जन्मल्यापासूनच !

पहिल्या महिन्या पासूनचीच प्रथा ...घरापुरता साजरा दर महिन्याला 
यात आई-बाबा, आजी-आजोबा, यांचाच उत्साह असतो महादांडगा ... 

पहिल्या वर्षाला मात्र तो होतो दणक्यात ...
इथून पुढे बाळाला समजते त्यातली गंमत ...
दरवर्षी उत्सवमूर्तीचं, वाट बघणं सुरु होतं ...
हळूहळू त्याला, शिंगंही फुटायला लागतात ...
वयानुसार मागण्या सुद्धा वाढायला लागतात ...
अन् दरवर्षी त्या चढत्या-क्रमातच असतात ...!

तरीही वाढ-दिवस नक्की साजरा होतो ...
कधी-खूप उत्साहात-धूमधडाक्यात ...
तर कधी कधी काहीसा थोडक्यात ...
तरीही वेळ कसा जातो नाही समजत,
धमाल दंगा-मस्ती, हसण्या-खिदळण्यात ...
भुर्रकन उडतो आनंदात-गप्पा-टप्पात ...

वास्तविक पाहता, वाढतच असतो आपण ...
जन्मल्यापासून प्रत्येक क्षणा-क्षणाला ...
जर एक वर्ष पूर्ण करणं हा "मैलाचा-दगड" मानला,
तर वाढ-दिवस साजरा होणं योग्यंच, दर-वर्षाला !

तसं पाहिलं तर, आपण नुसतं वयानंच नाही वाढत ...
विचारांनीही वाढतो-वयाबरोबर विचार सुद्धा होतात परीपक्वं  !
नुसतं वयानं वाढून चालणार नाही...कृतीतूनही वाढायला हवं ...
फक्तं स्वतःसाठीच न जगता, इतरांसाठीही जगून बघायला हवं ...
"दुसरा" हा खरोखरचा "दूजा" नसून, आपलंच एक"विस्तारित-स्वरूप "!
हा विचार पक्का रूजला की गोष्टी सोप्या होऊन संचारतो नवा-हुरूप ...

दुसऱ्यात" स्वतःला " ज्या क्षणाला, पाहता आलं ...
त्या-क्षणाला परम-आनंदात खरं-जगणं सुरु झालं ...
जणू याची-देही-याची-डोळा, "सत-चित्-आनंद-पर्व " सुरु झालं !
जणू याची-देही-याची-डोळा, "सत-चित्-आनंद-पर्व " सुरु झालं !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "