कविता - 🌷 ' भाली प्रकटे त्रिकाल-ज्ञान ' तारिख - १६ सप्टेंबर २०१६
कविता 🌷 ' भाली प्रकटे "त्रिकाल-ज्ञान" '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - १६ सप्टेंबर २०१६
अध्यात्म-विषयीचा खरा अभ्यास ...
अंधारातून स्व-प्रकाशाकडे प्रवास ...
तामसी-जीवन-जगणं न येई रास,
तर अथक करावाच लागेल प्रयास ...
स्तोम नसावं, हवी मनोपासना...
सदा हवी अंतःकरणी सद्भावना ...
उजळुनी देह-दीपक केली अर्चना,
लक्ष-दीप उजळती-ईश्वरी-संकल्पना ...
देवत्व म्हणजे सात्त्विक दैवी-गुण ...
पूर्णतः समर्पित, निराकार निर्गुण
अवतार रूपात करी जगत् कल्याण
भू-वरी सृष्टी-नभी रवी-चंद्र निर्माण ...
ज्योत-ज्योत होई हृदयी प्रकाशमान ...
जल-स्रोत-स्रोत बने गंगोत्री-समान ...
मना-मनात प्रेम-दया-भाव दैदिप्यमान ...
भाली प्रकटे तेजस्वी "त्रिकाल-ज्ञान" ...
देव न असे बंधनात बांधलेला ...
शेता-शेतात बीज-रूपे रुजलेला ...
जरी राऊळी पूजन-अर्चन-सोहळा ,
तो सदा हृदयस्थ-गाभाऱ्यात वसलेला ...
तेजाला ओवाळीते नयन-ज्योती ...
हृदयीच्या-भावार्थाने चक्षू साश्रु होती ...
विणा-वादन होता सुस्वर झंकारती ...
जणू सप्त-सुर-स्वर्ग धरेवर अवतरती...
जाऊनी भगवन्तासी शरण,
करुनी श्वासांचा झुला पाचारण...
देह रूपी नजराणा चरणी अर्पण ...
यज्ञकर्मे फिटे जन्मो-जन्मीचे ऋण ...
श्रीहरी भक्ती-भावाचा भुकेला ...
सृष्टीच्या कणाकणात सामावलेला ...
चराचराच्या अणुरेणुत तो संचारलेला ...
दरेक जीवात, अंशतः तो विसावलेला ...
नका व्यर्थ शोधू त्याला इथे वा तिथे ...
त्याचं अस्तित्व माणसा-माणसामधे ...
प्रकटे जड-स्थूल-वा-सूक्ष्म रूपांमधे ...
जळी-स्थळी-पाषाणी, दरेक अणूरेणूमधे ...
मिटताच दो-बाह्य-नयन,
सहजी अंतःचक्षू उघडून,
सद्-भावे अंतरी डोकावून,
स्वच्छ व सुंदर होतसे दर्शन ......
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷
Comments
Post a Comment