कविता - 🌷 " तेंव्हाच सार्थकी लागे ही निर्मिती "

कविता - 🌷 " तेंव्हाच सार्थकी लागे ही निर्मिती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ३ सप्टेंबर २०१६

विधात्याने केले माणसाला निर्माण,
पूर्ण असूद्या या एका गोष्टीची जाण...
मन म्हणजे गुण-दोषांची आहे खाण,
कुणी नसे मोठा व कुणीही नसे सान 

प्रत्येक अवयव असतोच महत्वाचा...
त्याचं कार्य, भागच ईश्वरी योजनेचा...
एव्हढसं पोट, पण फुकाचा गाजावाजा...
इवलीशी जीभ, पण सततची तोंड-पूजा...

नियम एकच आखून दिलेला,
भुके इतकाच घास असतो दिलेला...
अति अधीन झाल्यास घात आहेच ठरलेला...
भूकेला मूठभर कोंडा अन् धोंडा हवा निजेला...

वरती आभाळी जर असेल चांदणं...
तर संताना होई जणू गगन थेंगणं...
आता कसलं पुन्हा जाणं अन येणं...
प्रभूपदी सर्वतोपरी एकरुप होणं...

जन-निंदा असे ती क्षणभंगुर, 
महत्व न देता दुर्लक्षावी जरूर...
न ठेंवावा दुराभिमान वा गुरूर...
कोणत्याही कारणे न व्हावे मगरुर...

आपणच ठरवावे योग्य जीवन-सार...
चालत रहावे अथक योजनं अपरंपार...
आत्मानन्दास मग न उरेल पारावार...
सर्वत्र मग 🕉कार नादब्रह्म ओंकार...

आधी करूनी नेटकासा संसार...
साथीला असावे सद-आचार-विचार...
नाही मग उणे त्या सज्जनास फार...
विचार पक्का, हेच जीविताचं सार...

नका वळू फिरून दुर्गुणांकडे... 
स्वयं खंबीर, तर ना होई वाकडे...
हे निजहितासाठी छोटेसे सांकडे...
हा मार्ग न्हेईल फक्त ईश्वराकडें...

अति-कडू वाटे जरी हे अंजन...
मनी तेवू दे अध्यात्मरुपी निरांजन...
रात्रं-दिनी मुखी नाम-संकीर्तन...
तेव्हाच होतसे हृदय-परिवर्तन...

सर्व जन ऐकावी एक विनंती...
कास धरावी सदा विश्व-शांती...
सत्-ज्ञानाची आस लागे अंती...
तेव्हाच सार्थकी लागे ही निर्मिती...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🌅
















Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "