कविता - 🌷 " बाल-विश्व "
कविता - 🌷 " बाल-विश्व "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख २२ सप्टेंबर २०१६
आपल्याला वाटतं, बिचारी लहान मुलं ...
पण अगदी काही साधं-सुधं काम नसतं ...
त्यांचं सुद्धा एक खास बाल-विश्व असतं ...
त्यांच्या आई-भोवतालीच, ते विश्व फिरतं ...
त्या विश्वात चुकून जरी कोणी केला हस्तक्षेप,
त्यावर त्यांच्यापरीने, त्यांचं "प्लॅनिंग" ही असतं ...
ही गोष्ट सुरु"मिरजे"पासून, जिथं हे सर्वच घडलं
विश्वास नसेल बसत, तर मग पहा आता गंमत ...
अस्मादिक घरचा "लाडोबा," कारण शेंडेफळ
बिल्कुल "टॅन्ट्रम्स" शिवायच, मनासारखं सगळं ...
बालपण एकूण लाडाकोडात सुरळीत चाललेलं ...
पाहुणीच्या येण्यानं कौतुक थोडं घटू होतं लागलं !
हां-हां म्हणता मग पालटू लागलं चित्र ...
घरी आलेली आत्ते-भाची होती विचित्र ...
जन्मापासूनच आईचं नव्हतं तिला छत्र ...
आईविना-पोर-म्हणून, मामीकडे सुपूर्त ...
तिची मामी म्हणजे, माझी आई ...
आईची वाटणी मला मंजूर नाही ...
माझ्या बालबुद्धीने काही प्रयत्न केले ...
आता मात्र वाटतं ते फार "बालिश"होते ...
पाहुणी म्हणून ४/५ दिवस ठीक होतं ...
पण तिला माझ्या घरी कायम ठेवायचं,
असं वारं, चक्क वाहू लागलं अचानक ...
या सर्व घटनांमुळे माझं धाबं दणाणलं ...
त्वरित पाऊल उचलायचं, मनोमन ठरवलं
मोठी असूनही तिला माझ्या वर्गात ठेवलेलं !
प्रत्येक विषयात ती "ढं" आहे असं सिद्ध केलं ...
तिला प्रयत्नपूर्वक "कम्फर्टेबल" होऊ न दिलं ...
शाळेत तर थोडं फार सहज जमून गेलं ...
पण घरी खूप आघाडींवर लढायला लागलं
माझं वागंणं बघून आईला आश्चर्य वाटलेलं ...
तिला घोर की हिला, अचानक काय झालं ...
शेवटी रात्री उशिरा मोठ्यांची सभा झाली ...
सर्वांनी मतं मांडली, ती माझ्या बाजूने होती ...
सरते शेवटी सर्वानुमते तिची बोळवण झाली ...
अन् मी सुटकेचा निःश्वास टाकला, फत्ते झाली ...
काही वेळ माझं बालमन खुश झालं
पण खरं तर ते फार काळ नव्हतं टिकलं ...
का ते माहित नाही, पण मन खट्टू झालेलं ...
आश्चर्याची गोष्ट-मला चक्क करमतही नव्हतं !
आज मला, तिला सॉरी म्हणावंसं वाटतं ...
आमच्या घरी राहून तिचं आयुष्य कदाचित,
बदललं असतं, अधिक चांगलं झालं असतं ...
प्रत्येकाचं स्वतःचं विशिष्ट असं नशीब असतं ...
पण आज ही कविता लिहिताना नक्कीच वाटतं,
आईबाबत इतकं "पझेसिव्ह" व्हायला नको होतं,
दुसरं मन म्हणतं, आई म्हणजे माझं आद्य-दैवत...
रिझल्टच्या दिवशी,उभी राही गॅलरीत वाट पाहात...
येऊन"पहिला क्रमांक"असं म्हणून तिला बिलगेपर्यंत ...
असा एकही निकाल नव्हता ...
जेव्हा आशिर्वाद, माझ्या आईचा ...
माझ्या पाठीवर उभा नव्हता ...!
आज पूर्णपणे जाणवतं, माझी माता...
माझ्या सद्भाग्याचा केवढा मोठा ठेवा ...
क्षणोक्षणी भासते तिची पुण्यशीलता ..
सदैव शितल अशी मायेची छत्र-छाया ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🌅
Comments
Post a Comment