कविता 🌷' मोल आणि अनमोल '

कविता - 🌷 " मोल आणि अनमोल "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - १३ सप्टेंबर २०१७

" दाम करी काम वेडया दाम करी काम...."

प्रत्येक गोष्टीला "मोल" नक्की असतं,
पण ती "अनमोल" असेलच असे नाही.

आईची कूस, अनमोल ...
तिने केलेलं संगोपन अनमोल...
तिचे संस्कार बहुमोल ...
तिचं ऋण, अनमोल ...
याउलट पाळणाघर, जरूरीचं अन् मोलाचंही ...
पण ' मामला मात्र सोयीचा '...

वडीलांचं छत्र कणखर, प्रेमळ व मजबूत ...
चिमुकल्या हातात घट्ट पकडलेलं त्यांचं बोट,
त्या इवल्याश्या जीवाला किती आश्वस्त करणारं ...

एखाद्या काका-मामा-दादा याचा सहवास 
मोलाचा, पण बाबांची सर त्यास खचितच नाही ...

पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून,
मुलांचं उच्च शिक्षण, त्यासाठी परदेशी गमन
यासर्व गोष्टीचं " शिव-धनुष्य " पेलणं ...
केवळ अनमोल, त्यास तोडच नाही ...

त्याची सर, बँका-पतपेढ्या 
यांच्या दसपट कर्जाला,
कदापि येणे नाही ...

वेळोवेळी आप्त-स्वकीय-मित्र-मैत्रिणींचं मार्गदर्शन जरी 'मोलाचं ' तरी 
" वेळीच " पोट-तिडकीने दिलेला 
जन्मदात्यांचा अनमोल सल्ला ...
केवळ बहुमोल ...

दुष्काळ-ग्रस्त शेतकऱ्यांना " वेळीच " केलेली मदत,
अनमोल ...
वैफल्य-ग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्मघातानंतर,
मूठभर पैसा व ढीगभर आश्वासनं,
एकदम फोल व म्हणून निंदनीय ...

बैल गेला अन झोपा केला, अशातली गत ...

महापुरात शेतं-गावं-गुरं-ढोरं 
सर्व वाहून नष्ट होताना,
दिलेला मदतीचा हात,
अनमोल ...

पुराच्या ठिकाणी मंत्री-संत्री भेट देणार, 
विमानातून थोडी अन्नाची पाकिटं फेकणार ...
केवळ ढोंग, दिखावा अन वरवरची मलमपट्टी ...
एकदम फोल ...

भूकंम्प-विषयी पूर्व-सूचक अद्यावत यंत्रणा
" वेळीच " बसवून-वापर करून धोका टाळणं, 
नक्कीच बहुमोल ...
याउलट भूकंम्प-ग्रस्तांच्या प्रश्नावर नुस्ती चर्चा-चर्वणं, अन् वायफळ उहापोह ...
एकदम फोल म्हणून आक्षेपार्ह ...

परिस्थितीवश, शिक्षण मनाजोगतं न झालं, 
तरी आपल्या भावंडांना, मुलाबाळांना ते उपलब्ध 
करून देणं ...
त्यासाठी कांही अंशी, सक्ती सुध्दा करणं,
अत्यंत बहुमोल ...
म्हणून अतिशय वाखाणण्याजोगं ...

भुकेजलेल्या गोर-गरीब, 
अंध, अपंग, अनाथ-जना,
 "यथाशक्ति", झाकल्या-मुठीने 
अन्न-दान, विद्यादान करणे,
अनमोल ...

थोडक्यात काय,

मोल, अनमोल, बहुमोल ...
सर्व एकाच नाण्याच्या अनेकानेक बाजू ...
आपलं-आपणच ठरवायचं त्यांचं " मोल-मोजमाप "
अन् त्यासाठी  निवडायचा " योग्य-तराजू " ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले 

🙏�🌷🕉

Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "