कविता : 🌷' दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी '
तारिख - २८ सप्टेंबर २०१६
कवितेचं नाव - 🌷"दुसरं मागणं नसे ईश्वरापाशी"
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
सळसळणारं हे नव-तारुण्य ...
जणू बहरलेलं नवं-लावण्य ...
स्वर्गच भासे मज घन-अरण्य ...
सारी सुखं उभी, कांही नसे नगण्य ...
फुलां-परि सारं-कांही ताज-टवटवीत वाटतय ...
झुळुकीच्या झोक्यावर आज डोलावंसं वाटतंय ...
इवल्याशा दव-बिंदूलाही खूप-खूप जपायचंय ...
मन-मोहक भ्रमराला गुंगवायंचंय-गुंतवायचंय ...
गुन-गुन गुंजारवाच्या तालावर,
प्रसन्नतेची हलकीच उठते लहर ...
तन-मन धुंद-फुंद होऊन उमलतंय ...
मज कळीचं जणू रूपांतर होतंय ...
सुरेख रंगीबिरंगी सुमनासमान वदन ...
चहू-दिशानी आनंदी-आनंद ओसंडून ...
वाहतो मंद-सुगन्ध फुला-फुलामधून ...
अवघी धरणी-माय तेजाळली तृप्तीतून ...
का लाज उतरे अशी गोड गुलाबी गाली ...
जणू रविस भेटण्या संध्या सजलीधजली ...
कुणी बरं लावली ओठास आज ही लाली ...
सजले-नटलेे आज मी लेवून कुंकुम भाळी ...
प्रत्येक श्वास झाला सुगंधी ...
रात्रीच्या प्रहराची अजुनी धुंदी ...
क्षणनक्षण मन झालं हे आनंदी ...
जीवनी नव-पर्वाची ही तर नांदी ...
वाटे हा सुवर्णकाळ संपू नयेच कधी ...
सृष्टी देखील सामील राहून त्यां साक्षी ...
अशीच सुखाची संतत-धार बरसावी ...
दुसरं काहीच मागणं नसे ईश्वरापाशी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🌅🕉🌷
Comments
Post a Comment