कविता :🌷' ख-या भक्तिचा भुकेला '
कविता :🌷 ' ख-या भक्तिचा भुकेला '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १५ जून २०२३
ख-या-भक्तिचा तो सदा असतो भुकेला
भक्तांच्या मूक-हाकेला सदा धावून गेला
ज्ञानदेवांसाठी रेडा बनून वेद-मंत्र वदला !
ज्ञानेश्वरीमधून मराठी-भाषेत अवतरला !
दुष्ट-होलिकेचं भस्म करुन,अग्नी शांत झाला
खांबातून प्रकटून मुजोर दानवाचा वध केला
भाबड्या भक्त-प्रल्हादाला अलगद वाचविला
दानवी-वृत्तीवर सदाचारानं विजय मिळवला !
जुलमानं अभंग-पोथ्या नदीत फेकून दिलेल्या
संत-सज्जन-अंत:करणाच्या ठिक-या झाल्या
तुकारामांच्या अभंगांचा जळी सांभाळ केला !
अद्भुत-अभंगवाणीचा विनाश होऊ न दिला !
रात्रंदिवस देवाची आळवणी करणार्या जनीला
दळण-कांडण करुन कामात हातभार लावला
संतांच्या-घरी पाणक्या बनून-सेवा देत राहिला !
दास होऊन श्रीहरी भक्ताची कामं करित राहिला
कबीरा-घरी शालू-शेले विणून मदत-रूप झाला
संशयी-राणानं विषाचा प्याला मीराबाईला दिला
विष-पेयाचं अमृत करुन मीरेचा जीव वाचविला
घोर तप-साधनेत परम-भक्त धृव-बाळ रक्षिला !
एकनाथांनी आणलेलं गंगा-जल पिण्याकरिता
मरणासन्न गर्दभाच्या रुपात प्रकटला तो दाता !
महालाची पंचपक्वान्ने सोडून निभावली मित्रता
मित्र सुदाम्याच्या पोह्यांचा आनंद लुटता-लुटता
अगणित आहेत भक्ति-रसाच्या विलक्षण गोष्टी,
जोवर आहेत सूर्य-चंद्र-ग्रह-तारे व अवघी सृष्टी
कधीही-कुठेही-कुणाच्या-तरी रुपात मदतीसाठी
भक्त असता संकटी, सोडविण्या येतो जगजेठी !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment