कविता :🌷' पखरण आनंदाची '
कविता : 🌷' पखरण आनंदाची '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, २७ मार्च २०२३
युगायुगांचं अविरत हे सृष्टीचं काल-चक्र
स्वार्थी-कृतघ्न मनुष्याचं वेगळंच दुष्ट-चक्र
कैक अक्षम्य अपराध केले निसर्गाविरुध्द,
तरी ओंजळ-भरुन लाभे संपदा, निसर्गदत्त!
वसंत ऋतूच्या आगमनाने नटतो निसर्ग
वृक्षवेलींना लालसर पालवीनी येतो बहर
आंब्याच्या फांदी-फांदीवर फुलतो मोहोर
सण-वारांमुळे सदा-सर्वदा आनंदी-प्रहर !
ग्रीष्म ऋतूत वटपौर्णिमा-आषाढी एकादशी
वड-पूजा, जणू एकरूप होणं सृष्टी-देवतेशी
आषाढीला भक्तांसाठी पंढरपूरी असते काशी
विठ्ठल-रखुमाई-दर्शने जळती पापांच्या राशी !
वर्षा ऋतूसह येई नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
बहीण-भावाचं पवित्र बंधन अन् सागर-वंदन
गणेश चतुर्थी, त्या आधी हरितालिकेचं पूजन
वाजत-गाजत गौरींसह गणपती-महाविसर्जन !
शरद ऋतू म्हणजे नवरात्र, कोजागिरी, दिवाळी
नव-दुर्गा-पूजा, कोजागिरी-रात्र "को जागरती"?
प्रेमाचे लक्ष दीप उजळून, मनांची घालवी काजळी
उजाडता सूर्य-किरणे अवघी चराचर-सृष्टी उजळी
हेमंत ऋतू घेऊन येई श्री दत्त जयंती, मकर-संक्रांत
अवतरला ब्रम्हा-विष्णु-महेश यांचा त्रिमूर्ती अवतार !
संक्रांतीपासून होते सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात
गुलाबी थंडीत हुरडा-तीळगुळ-गुळ-पोळ्यांवर ताव !
शिशिर ऋतू आणतो मस्ती, होळीची अन् रंगपंचमीची
होळीत टाकून राख होई अप्रिय-नकोशा सर्व स्मृतींची
विविध रंगात माखून, गरज नुरेल खोट्या मुखवट्यांची
रेलचेल सहा ऋतूंची-सणासुदीची, पखरण आनंदाची !
रेलचेल सहा ऋतूंची-सणासुदीची, पखरण आनंदाची !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment