कविता : 🌷 ' चिरंतन प्रचिती '
कविता :🌷 ' चिरंतन प्रचिती '
कवयित्री: तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, १५ फेब्रुवारी २०२३
वेळ : ११ वाजून १० मि.
'मनाचे श्लोक' हा समर्थ रामदासांचा जणू वाग्-यज्ञ
त्यामधील अमूल्य ज्ञानावीण, आपण सारेच अनभिज्ञ !
'मन' हे रुपक वापरुन समर्थांचा मानवजातीला उपदेश
सुप्त स्वाभिमान जागृत करुन जगण्याचा अप्रतिम संदेश
छत्रपतींच्या स्वराज्य-स्थापनेत त्यांचे योगदान खास
'ठकासी व्हावे महाठक' असे म्हणाले समर्थ रामदास
कैक पिढ्या तयार केल्या गावो-गावी स्थापून मठ,
शक्ती आणि बुद्धी वापरुन हाणून पाडले शत्रूंचे कट !
समर्थांची जरी साधी, रोखठोक, भक्तीपूर्ण शब्दरचना
उपदेशांमृतरुपी-सल्ला देते, लाख मोलाचा-सद्वर्तनाचा !
कालातीत असं अनमोल ज्ञान अन् अचूक मार्गदर्शन,
शेकडो वर्षे होऊनही, मूढ-मना आजही देते संजीवन !
'प्रपंच करावा नेटका' या त्यांच्या प्रसिद्ध उक्तीनुसार,
प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालण्याचा केला प्रचार
सारासार विवेक, सद्विचार आणि सद्वर्तनाचं सदाचरण
स्वाभिमानाने जगण्यासाठी अत्यावश्यक असं पथदर्शन
वास्तव्य सज्जनगडावर स्वराज्य-मोहिमेच्या तालिमी नाना
कायम भक्ती आणि शक्ती या दोन्हीची सारखीच आराधना
'जगी सर्व सुखी असा कोण आहे' प्रश्नाचं देऊन चोख उत्तर,
मनाला संबोधून समर्थांनी पूर्ण मानवजातीला केलं निरुत्तर
जरी १६८२ ला समर्थ रामदास पंचतत्वात विलीन झाले,
त्यांच्या 'समर्थ' शब्दांमधून ते कायम स्फूर्ती देतच राहिले !
' मरावे परि किर्ती रूपे उरावे ' ही त्यांची एक प्रमुख उक्ती
त्यांच्या चिरंजीवी लेखनातून तिची निर्विवाद येते प्रचिती
त्यांच्या चिरंजीवी लेखनातून तिची निर्विवाद येते प्रचिती !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment