कविता : 🌷' मैत्री-निखळ आनंदाची खात्री '
कविता : 🌷' मैत्री-निखळ आनंदाची खात्री '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दिनांक : रविवार, ३१ जुलै २०२२
वेळ : १० वाजून २८ मि.
सांगा नेमकी आहे तरी काय ही मैत्री ?
भर पावसात भिजू न देणारी जणू छत्री !
मन प्रसन्न-शांत करणारी यात्रा तीर्थक्षेत्री
जशी मंत्रांच्या एकमेव स्थानी आहे गायत्री
तशी सर्व नात्यांमध्ये अनमोल आहे मैत्री !
मुखवट्यावीण आयुष्य जगण्याची एकसूत्री
रंग-रुप, वय, जात-पात, गरीबी-श्रीमंती,
स्त्री-पुरुष, अनुकूल-प्रतिकूल परिस्थिती
दोन समसमान वा भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती
कळत-नकळत मैत्री जमते जशी जादूची छडी!
पति-पत्नी, बाप-लेक, शेजारी-पाजारी, सवंगडी
दिवसेंदिवस ती घट्ट होत जाते जणू रेशीम लडी
श्रीकृष्ण आणि सुदामा यांची अलौकिक मैत्री
पंच पक्वान्नं झाली फिकी मूठभर पोह्यापुढती !
अशी दुर्मिळ दोस्ती की "न भूतो न भविष्यती"!
बाल-शिवाजी व त्यांचे लढवैये शूरवीर मावळे
"आधी लगीन कोंढाण्याचे" छाती ठोकून गर्जले
तळहाती शिर घेऊन सदैव प्राणपणाने लढले !
अकबर-बिरबल, एक राजा दुसरा सल्लागार
पण त्यांच्यातील परम मैत्रीला नव्हता पारावार !
रुसले-हिरमुसले तरी मित्रावीण नाही करमणार!
कर्ण-दुर्योधनाची जगावेगळी पण सच्ची मैत्री
एकीकडे सूर्य-पुत्र तर दुसरा जणू काळ-रात्री
एक उदार-सज्जन दुसरा दुष्ट, कुटील पातकी
क्रूर नियतीने जीवघेणा डाव साधला भारी,
मूळचा कुंती-पुत्र-कर्ण, झाला दुष्टांचा कैवारी
ओशाळला जो जेंव्हा समजली खरी जन्मदात्री !
बेधडक देऊन कवच-कुंडले केले दान सत्पात्री
उदार, दानशूर कर्णाने तरीही जागवली मैत्री !
त्याच्या नामोल्लेखाविना कविता राहील अधुरी
धन्य तो कर्ण, धन्य त्याची असामान्य मैत्री
मैत्रीची बूज राखण्या स्वतःची दिली आहुती
मैत्रीला जागवून अजरामर झाला या जगती !
श्रीकृष्ण-सखा आणि पांचाली-राणी-द्रौपदी
बंधुभाव होता तरीही विशुद्ध मैत्रीची महती
तिच्या आर्त हाकेला तत्क्षणी आला दयानिधी
आजच्या बाजारु, संधीसाधू वृत्तीच्या काळामधे
बेगडी मैत्री कावळ्याच्या छत्री सारखी फोफावते
तकलादू इतकी की क्षणार्धात समूळ नष्टही होते
भक्कम, नि:स्वार्थी मैत्रीसाठी स्वच्छ मनं हवीत
मतं वेगवेगळी असली तरी मनं नसावी कलुषित
निखळ मैत्रीच्या नात्यात पारदर्शकता ही हवीच !
स्नेह म्हणजे स्निग्धता, स्नेही म्हणजे गाढी मित्रता
सच्च्या मजबूत दोस्तीसाठी हवी शुद्ध मानसिकता
ती वृद्धिंगत होण्यासाठी हवी मनाची परिपक्वता
या कल-युगात आपण सारेच बे-घडीचे-यात्री !
पण जीवन सुसह्य व सुखदायक करणारी मैत्री,
देते निव्वळ, निखळ आनंदाची पक्की खात्री
देते शुद्ध, निखळ आनंदाची पक्की खात्री !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Comments
Post a Comment