कविता - 🌷 " ईश्वराधीन-नाती "
तारिख - ३० नोव्हेंबर २०१६
कविता - 🌷 " ईश्वराधीन-नाती "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
नात्यांचे बंध म्हणजे जणू समईच्या दिव्य-ज्योती ...
मंद-शांत, संतत-संयत तेवणाऱ्या सस्नेह-वाती ...
भातुकलीपासून गोळा, जिवाभावाची मित्र-मंडळी ...
भाग्यवंताच्या नशीबी असती सखे-सोबती भूमंडळी ...
काही महत्वपूर्ण अशी नाती, ईश्वराधीन असतात ...
प्रत्येकाला आई-वडील या तत्वानुसार मिळतात ...
पूर्व-सुकृतानुरूप जन्मगाठी बांधलेल्या असतात
अगणित पूर्व जन्मोजन्मीची-पुण्याई फळा येते ...
तेव्हा मातृ-पितृ-छत्रछाया आयुष्यभराची लाभते
केवळ सद्-भाग्यानंच होतं, भावंड-प्रेम लाभणं ...
अन् एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला येणं ...
पितृवत् अपार माया करणारे प्रेमळ वडील-बंधू ...
बाल्यावस्थेत जो आधारस्तंभ, तो होतो केंद्र-बिंदू ...
आईची उणीव अजिबात भासू न देणारी बहीण ...
भगवंताच्या कृपा-प्रसादाविना, मिळणं कठीण ...
अक्षरशः जीव ओवाळून टाकावा असं अभूतपूर्व प्रेम
विधात्याच्या नियोजनानुसार, नेमका अचूक लागे नेम !
सुख-देणारी, अभिमान वाटावा अशी, गुणी मुलंबाळं ...
नक्कीच कैक-जन्मींच्या सद्कर्म-सद्-कृत्यांची फळं !
बर्याचदा अगदी अनोळखी-अनामिक अशी व्यक्ती,
जलप्रवाहातील ओंडक्यासमान अकारण टक्करती ...
प्रसंगी, निरपेक्ष भावनेने मदतीचा हात देऊन जाती ...
निस्वार्थी परोपकारी भावनेनं सदैव उपयोगी पडती ...
उपकाराची परत-फेड करण्यास, एकही संधी न देती ...
जराही अवडंबर न माजवता, मूक-मार्गदर्शन करती ...
व्यावहारिक नात्यांच्या कोणत्याही ढोबळ परिभाषेत
वस्तुतः न बसणाऱ्या अशा महान विलक्षण व्यक्तीस,
विधात्याचा-दूत म्हणावं की त्याचा तरल सूक्ष्म-संदेश ...
या जगीं सर्वजण एकाच अदृष्य-अगम्य-सूत्रानं बंधीत ...
"ब्रह्म-तत्व" हे एकमेव दिव्य-बंधन असे प्रत्येक व्यक्तीत...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment