कविता -🌷 " क्षण मोलाचे-आनंदाचे "

कविता -🌷 " क्षण मोलाचे-आनंदाचे "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - २७ नोव्हेंबर २०१६

आपल्या नकळत हळूच, चोर-पावलांनी
रेतीच्या बारीक-बारीक सुवर्ण कणां-समान
आयुष्याचे क्षण-न्-क्षण जाती ओघळूनी
पाणीदार मोत्यांची लड जर तुटूनच गेली,

टप्पोरे मोतीच-मोती जातील घरंगळून ...
एकवेळ पाऱ्याला ठेवता येईल पकडून ...

पण पार निसटूनच गेलेल्या समयाला
झंझावाती वेगात हलके स्पर्शून गेलेल्या,
प्रचंड ओढ अशा, वाहत्या पाण्याला
कसं काय बरं ठेवणार मुठीत धरून ...

क्षण सारे मोलाचे-आनंदाचे ...
भुरुभुरु,उडणाऱ्या कारंज्यांचे 
करती, उधळण सप्त रंगांचे ...
अगणित-अगम्य रंग-छटांचे ...

इंद्रधनुचे, जणू सुख पाझरणारे ...
मनाला सतत भुरळ घालणारे 
अवघं देह-भान विसरवून टाकणारे 
अगम्य-अनामिक ओढ लावणारे ...

क्षण मोरपंखी ...नाचत येती थुई-थुई ...
प्रीतीचे-अनमोल क्षण सोनेरी-रूपेरी ...
मनाच्या डोही झळकती सोन-सकाळी
गंधित क्षण आस्मानी-आरस्पानी 

मधुर क्षण चंदेरी-गोड थट्टा-मस्करी
सुखद हास्य-कल्लोळ  ऐन-दुपारी ...
मदहोश-क्षण ते लुकलुकती रात्रभरी ...
नाजूक-क्षण मोहमयी भान हरपे सदाही ...

क्षण निरागस ...बाळाच्या हास्यासम् खिदळणारे
क्षण अवखळ ...वासरासम बागडणारे
क्षण स्तब्ध-प्रेमी-जीवांना जोडणारे ...
क्षण अनामिक-सदा हुरहूर लावणारे ...

क्षण बहुमोल ...भक्ति-रसात चिंब भिजलेले ...
डोळ्यांच्या डोहांमधुन ...नकळतच झिरपणारे ...
क्षण अनमोल ...ब्रह्मानंदी तल्लीन करणारे ...
आप-पर-भाव मिटून, स्थूलातून सूक्ष्माकडे झेपावणारे ..
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆














Comments

Popular posts from this blog

कविता - बालगीत 🌷 ' रंगीत-झंगीत ' तारिख - रविवार, २१ जानेवारी २०२४

कविता :🌷' माणूस नामक बेट '

कविता - 🌷 " संक्रमण-सन्मार्गाकडे "