कविता - बालगीत 🌷 ' गंमत-जम्मत ' तारिख - बुधवार, २७ डिसेंबर २०२३

कविता - बालगीत 🌷 ' गंमत-जम्मत '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २७ डिसेंबर २०२३
वेळ - दुपारी १ वाजून २ मि.

च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ 
पख्खालीचे पाणी प्याऊ ...

च्याऊ म्यांऊ, च्याऊ म्यांऊ 
पख्खालीचे पाणी प्याऊ ...

एकदा किनई, एक असते मनी-माऊ ...
गोरी गोरी छान, अन् मऊ मऊ मऊ ...

डोळे मिटून म्हणे ती, म्याऊं-म्याऊं ...
भूक लागली की ती, शोधायची खाऊ ...

बंद दरवाज्यावर करायची, खुर्-खुर्-खुर्
नाही तर मग सुरू व्हायची, कुर-कुर-कुर

मनीमाऊच्या गडबडीने, आजी पण उठली ...
" थांब गं मने थोडी," मनीला ती म्हणाली ...

मग लगेच, आजीने दूध तापायला ठेवलं ...
थोडं चहाला ठेवलं, थोडं विरजण लावलं ...

थोडं कॉफीला ठेवलं, थोडं खीरीला ठेवलं ...
थोडं नैवेद्याला ठेवलं, थोडं घर म्हणून ठेवलं ...

थोडं पूजेला ठेवलं, थोडं बाळ-गोपाळांना दिलं ...
मग थोडं अर्जुनला दिलं, थोडं मनी-माऊला दिलं ...

इतका वेळ वाट बघत, गुपचुप बसली होती मनी ...
बशीभर दूध पाहून, तिच्या तोंडाला सुटलं पाणी ...

आजीने "पी" म्हणेतो, मनी बघत होती एकटक ...
लाल-चुटुक जिभलीने मग, मनीनं दूध केलं मटंक ...

चुटू-चुटू आवाज करीत, सारं दूध केलं तिनं फस्तं ...
मनीची करामत बघून, अर्जुनला वाटली खूप गंमत ...

अश्शी गोष्ट आहे मनी-माऊची, गंमत-जम्मत ...
अश्शी गोष्ट आहे मनी-माऊची, गंमत-जम्मत ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆








































































Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "