कविता - 🌷 " अस्सल-नायक शापित कर्ण " तारिख - ९ डिसेंबर २०१६

कविता - 🌷 " अस्सल-नायक शापित कर्ण "    तारिख - ९ डिसेंबर २०१६
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

उदारतेचं मूर्तिमंत उदाहरण ...म्हणजेच " सूत- पुत्र " कर्ण 
महाभारतात त्याच्या इतका पराक्रमी, शूर, लढवैय्या योद्धा
शोधूनही सापडणं कठीण ...

दुर्दैवाचा फेरा, त्याच्या जन्माच्या-आधी-पासूनच सुरु झाला बहुधा ...
कुमारी- माता कुंती व सूर्य यांचाच-हा तेजस्वी,मनस्वी व अद्वितीय पुत्र ...
समाजाला घाबरून, तत्कालीन रुढींना-डावलून, काही करणं अशक्य असताना,
कुंतीने मनावर दगड ठेवून त्याग केला, लाकडी पेटीत जन्मजात तान्ह्या अर्भकाचा
वाहत्या जलाशयात सोडलं त्यास गुपचूप-हे "काळंकुट्ट-कृत्य"केलं,रात्रीच्या अंधारात 

कालांतरानं एका निपुत्रिक जोडप्याला, हा दैवानं पाठवलेला खजिना सापडला ...
त्यांचा आनंद गगनात मावेना-राजमहालाऐवजी एका साध्या
सारथ्याच्या छोट्याशा घरातच, दुर्दैवानं कर्णाचं बालपण गेलं ...

त्याला आईचं वात्सल्य राधेकडून मिळालं-म्हणून पुढे त्याचं नाव "राधेय-कर्ण" पडलं ...
जन्मत: एकही गोष्ट त्यास सहज ना मिळाली-अगदी माता-पित्याची छत्रछाया असो,
किंवा योग्यतेनुसार शिक्षणासाठी गुरु-आचार्य मिळणं असो ...
दर वेळी दर ठिकाणी "सूत-पुत्र" असं हिणवलं जाणं-योग्यता असूनही कायम, कमी लेखलं जाणं ...
द्रोणाचार्यांनी नाकारलं, युद्ध-कलेचं शिक्षण-देणं ...

तो निराश न होता, त्यांचेही जे-गुरु, परशुराम- यांचा शिष्य बनला, पण त्यासाठी ब्राह्मण
असल्याचं नाटक त्याला करावंच लागलं ...मना विरुद्ध, खोटं-सोंग वठवावं लागलं ...
झालं सर्व शिक्षण पूर्ण, तो सर्व काही शिकुन, युद्ध-शास्त्रात,झाला निपुण ...
एकेदिवशी, गुरूंनी कर्णाच्या मांडीवर, डोकं ठेवून झोपले असता, वन्य किडा चावून 
मांडी रक्त-बंबाळ झाली, पण सहनशील कर्णानं हूं-कीं-चू नाही केलं ...!
गुरुंची झोप-मोड होऊ दिली नाही,बिल्कुल-जाग येताच, परशुरामांनी त्याला शाप दिला 
वास्तविक पाहता, तो "कौंतेय" असल्याचं, अगदी सुरुवातीपासून पक्कं माहित होतं ...
तरीही वेळोवेळी, त्याचा अपराध नसूनही, कित्येक शाप कर्णाला, भोगावे लागले ...

अन तेही कदाचित या शूर- वीराला हरवण्यासकमी पडतील की काय,याची खबरदारी म्हणून,
देवेंद्र-अर्जुनाच्या पिताश्रीनी,वृद्ध-ब्राह्मण-रुपात सुर्योपासनेच्या वेळी, कर्णाकडून,कवच-कुंडलं,
" दान "म्हणून मागीतली,जी जन्म-जात होती-हे दान, कर्णाचे " प्राण " मागण्यासारखंच होतं ...
तरीही तो " दान-शूर-कर्ण " मागे नाही हटला-उदार-दिलदार कर्ण स्वतःच्या शब्दाला"जागला "!

कुंतीनं ऐन युद्धाच्या आदल्या रात्री, त्याला सांगितलं त्याच्या जन्माचं रहस्य ...
अन् बदल्यात कर्णाकडून, घेतलं वचन, तिचे कोणतेंही पाच-पुत्र जीवित ठेवण्याचं ...!
शिवाय युद्धात, कोणतंही अस्त्र फक्त एकदाच वापरण्याचं वचनही तिनं घेतलं होतं ...

त्याच्या जन्माचं रहस्य सांगून, त्याला मानसिक धक्का देऊन,
त्याला कमकुवत बनवण्याचाच, केवढा हा केविलवाणा प्रयत्न ...
इतकं करूनही कर्णाचीच बाजू वरचढ-त्यामुळे जगातील सर्व नियम धाब्यावर बसवून,
कर्ण पाठमोरा, रथाचं जमिनीत रुतलेलं चाक काढण्याच्या प्रयत्नात असतानाच, अर्जुनानं,
संधी साधून, बाण मारून, केला कर्णाचा अंत ...!
त्याआधी थोडयाच वेळापूर्वी , कर्णानं अर्जुनाला निःशस्त्रं म्हणून जीवदान दिलं होतं ...

कर्ण,वास्तविकत: पांडवांचा ज्येष्ठ पुत्र ...सर्वच बाबतीत उदार,ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ...
पण दैववशे, अधर्माची बाजू घेतल्यामुळं, त्याचं हरणं व अंततः मरणं होतं, अटळ ...
पण त्यामुळे त्याचे सद्-गुण नाहीसे नाही होतउलट स्वनशिबाला बसला नाही दोष देत,
स्वतःच्या हिम्मतीनं शारीरिक-मानसिक बळ पणाला लावून,आयुष्याची रोवली भक्कम मेढ 

खरा-खुरा "नायक" असून, दैवजात करणीनं, त्याला हक-नाहक, गैररित्या शापित करुन
काळ्या रंगात, खलनायक बनवण्याचा फारच तुटपुंजा,हास्यास्पद,अन् केविलवाणा प्रयत्न 
जोवर पृथ्वीवर जीवन राहील ...कर्णाचं कर्तृत्व, उदारपणा-कायम-स्वरूपी झळकत राहील ...
जनमानसी उदात्त-उदार-कर्ण कोरला गेलाय, ती तेज:पुंज प्रतिमा कधीच पुसली नाही जाणार ...

कर्णाच्या वाट्याला सदैव फसवणूक येऊनही, त्यानं चांगलं वागण्याचाच सतत प्रयत्न केला
कुणालाहि,विन्मुख न पाठवून,शब्दाला जागला-मैत्रीला,पुत्र-धर्माला,दिल्या वचनाला जागला !
अधर्मानं तो लौकिकार्थांनं, जरी मृत्यू पावला, तरी खऱ्या अर्थाने तो मरुनही अजरामर झाला ...
अशा " न- भूतो-न-भविष्यती योद्धयाला-अजात-शत्रू-कर्णाला," मानाचा त्रिवार लवून मुजरा ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025