कविता - 🌷 " थरारक नाट्य " तारिख - शुक्रवार, २१ जूलै २०१७


कविता  - 🌷 " थरारक नाट्य "    
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले 
तारिख - शुक्रवार, २१ जूलै २०१७ 

कालच्या मधाळ अनुभवानंतर, पाय आपोआप वळले, थेट देनाली नँशनल पार्क कडे
रस्ते होते नाग-मोडी, वेडे-वाकडे-जणू देनाली स्वतः खेचत होता त्याच्याकडे ...

आदल्या दिवशीच्या, "टफ-ट्रेलवर"- बेहद्द खुश होते अमित-राहूल दोघेही
आजच्या सुंदर सोनेरी सकाळी -तिघंही निघाले फिरत वाट निराळी ...
काल घाटातून, गाठलं होतं सर्वोच्च टोक-आजचा मनसुबा गाठायचं तळाचं टोक...
ट्रेल बघायला साधी-सोप्पी-भुरळ घालणारी वाटत होती, मस्त मजेत चालली होती मंडळी ...

एकीकडचा रस्ताच होता बंद केलेला-एक सूचनावजा बोर्ड, होता लिहीलेला 
"अस्वलांचं वास्तव्य असण्याचा धोका"-जणूकाही, अस्वलांसाठी लिहीला होता ! 
का कोण जाणे, थोडंसं अंतर कापल्यावर-अचानक तिला आंतरिक संकेत जाणवला,
पाऊल पुढे टाकण्यास मन राजी होईना-दोन्ही मुलांना सांगून, त्यांना काही ते पटेना ...
शेवटी अस्वलांची शक्यता बोलून दाखवली-तरीही त्यांनी काढता पाय घेतला नाही...
केवळ त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून पुढे निघालो, खूप खाली उतरून गेलो आम्ही...

पोट-तिडकीनं परत फिरूया असं-निक्षून बजावलं, पण ढिम्मं, दोघेही ऐकेनात !
ऐन तारुण्य, त्यांचं सळसळणारं रक्त-नवनवीन आव्हानं पेलण्यास आसुसलेलं मन ...
अखेरीस ती स्वत:च-चढण चढायला उलट्या पाऊली, मागे वळली...
वाटलं आईच्या काळजीनं का होईना-दोघे मागोमाग येतील, तिची पर्स द्यायला तरी ...
ट्रेलमध्ये तिला वजन उचलायला नको, म्हणून राहूलनेच घेतली होती पर्स मागून ...

मनात ओंकाराचा उच्चार करंत-करतंच, संपूर्ण घाट कशी चढली ते तिलाही नाही समजलं
खाली वाकून बघते तर दोघेही पार ठिपके, अगदी तळापर्यंत जाऊन पोहोचले असावेत 
जेमतेम वर येऊन श्वास घेते-न-घेते तोच सर्वांना धोक्याची सूचना देणारी घोषणा झालीच !
सिक्योरिटीला मुलांची माहिती देऊन-त्यांना सुरक्षित वर आणण्याची-कळकळीची विनंती तिनं केली... 
पण मनाला स्वस्थता नव्हती-पुढाकार घेऊन, सतत पाठपुरावा करुनही तिला बेचैनी वाटतच होती...
 
विनंतीला मान देऊन शेवटी तिला-उंचावरून टेहळणी करुन मुलांना हेरण्याची सवलत मिळाली !
पहाते तर एक माजलेली आई-अस्वल व तिची दोन छोटी बछडी-हिरव्या गवतात हलत-डुलत रमलेली... 
तिच्या छातीत धस्सं झालं, तिचीही बछडी बाहेर असुरक्षित, त्यांना या धोक्याचा थांग-पत्ताही नव्हता...
सिक्योरिटीचा पिच्छा पुरवून अखेरीस-एका गार्डला खास वॉकी-टॉकी देऊन खाली होता पाठवला...
तिचा अवघा जीव, खाली मुलांजवळ होता-त्या विधात्यानंच केला असावा त्यांचा सांभाळ... 
दूरुनच पाहून,अस्वल व तिची पिल्लं, दोघांनी प्रसंगावधान दाखवून, धूम ठोकली विरूद्ध दिशेनं...
प्रत्येक मातेला तिच्या पिल्लांना जपायचं असतं, त्यांच्या जीवाला धोका जाणवताच, चवताळून हल्ला करते-
सुदैवानं अस्वल-आईला वास लागण्याआधीच, तिची पिल्लं सुखरुप आली, दुसऱ्या बाजूनं चढंण चढून...

आईला पहाताच, धापा टाकत आलेली दोन्हीही 
तिची पिल्लं अगदी लहान होऊन, तिला बिलगली,
तिच्या आनंदाश्रुंना आता मोकळीच वाट मिळाली ... 

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆


















Comments

Popular posts from this blog

कविता - 🌷 " परी या-सम-हा " तारिख - १० डिसेंबर २०१६

कविता 🌷 " एहसास "

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025