कविता 🌷- ' त्याला माणूस कधी म्हणू नये '

कविता - 🌷 " त्याला माणुस कधी म्हणू नये "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारीख- ७ सप्टेंबर २०१६

वेळी मदतीचा हात नाकारतो
उलट, पायही खेचतो त्यास,
सहयोगी कधी समजू नये ...

दोघात भांडण लावून,
लांबून मजा बघतो त्यास,
मित्र कधीही म्हणू नये ...

डोळ्यांवर पट्टी बांधून
न्याय-निवाडा होतो त्यास,
न्याय-देवता म्हणू नये ...

अन्यायाकडे डोळेझाक 
अन् गुन्ह्यांकडे करी पाठ त्यास, 
न्यायाधीश कधी मानू नये ...

मोठी मोठी वचनं देऊन
गरीबांची करी दिशाभूल त्यास,
पुढारी कधी म्हणू नये ...

सेवेच्या नावाखाली
स्वतःची तुंबडी भरतो त्यास,
नेता कधी म्हणू नये ...

बाया-बापड्यांना फसवतो
दिशाहीन ही करतो त्यास,
साधू कधी म्हणू नये ...

देवा-धर्माच्या नावानं जो
अराजक माजवतो त्यास,
संत कधी म्हणू नये ...

मुलीचा गर्भ मारून टाकते 
त्या निर्दयी बाईस,
माता कधी म्हणू नये ...

हुंड्यासाठी सुनेला छळते,
लोभांधाने जाळते अशा सासूला,
स्त्री कधी म्हणू नये ...

पैश्याच्या लोभापायी 
अपार छळ करणाऱ्यास,
पती कधी म्हणू नये ...

पोटची पोरं विकणाऱ्या 
निर्लज्ज, बेरड कसायास,
बाप कधी म्हणू नये ...

भोळ्या-भाबड्यांना लुटून 
महाल-माडया उभारतो,
त्याला दानी कधी म्हणू नये ......

काजळ काळ्या कृत्यांनी  
माणूसकीची करतो होळी,
त्याला " माणूस" कधी म्हणू नये........

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏�🕉🌅🌷

Comments

Popular posts from this blog

Poem - 🌷 " Live in Alignment " Date - 31 March 2025

कविता 🌷 " एहसास "

कविता - 🌷 " अनछुआ आसमां "